Maharashtra Budget 2022: अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात आज सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प
Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Budget Session) सुरु आहे. या अधिवेशनातील आजचा दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) विधिमंडळात सादर करणार आहेत. वर्ष 2022-23 या वर्षासाठी असलेल्या या अर्थसंकल्पाकडून राज्याच्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. कोरोना व्हायरस महामारी, त्यामुळे घेण्यात आलेला लॉकडाऊन, वाढलेली महागाई आणि बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन राज्य सरकार जनतेला काय दिलासा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकासआघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. राज्याचे अर्थमंत्री दुपारी 2 वाजता विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानभा या सभागृहात हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदी आणि इतर योजना यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या काल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्यासमोर यंदा अनेक मोठे प्रश्न आणि आव्हाने आहेत. यात प्रामुख्याने कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट या मुद्द्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Nana Patekar On Ajit Pawar: अजित पवार शांतपणे काम करतात, त्याची कधीच जाहिरात करत नाहीत - नाना पाटेकर)

दरम्यान, राज्याच्या जनतेलाही अर्थसंकल्पाकडून मोठ्या आपेक्षा आहेत. त्यामुळे राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देणार का? या शिवाय राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी आणखी कोणत्या नव्या संकल्पना राबवणार याबाबत उत्सुकता आहे.