
महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board) भूगोल विषयाचा (Geography) पेपर कोरोना व्हायरस संकटामध्ये रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने जाहीर केला. मात्र आता 10वीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागल्याने नेमके भूगोलाच्या रद्द झालेल्या पेपरच्या गुणदान पद्धतीबद्दल संभ्रम होता. मात्र शिक्षण मंडळाने हा संभ्रम दूर करण्यासाठी एक परिपत्रक जारी करत दहावी बोर्डाच्या भूगोलाच्या पेपरचे गुण इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची सरासरी (Average Marks) विचारात घेऊन 40 पैकी गुण दिले जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दिव्यांग विद्यार्थांच्या कार्य शिक्षण विषयाचे देखील मार्क इतर विषयांच्या तुलनेत मिळालेल्या मार्कांच्या सरासरीप्रमाणेच दिले जाणार आहेत. Maharashtra SSC, HSC Result 2020: कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान शिक्षक, मॉडरेटर्सना प्रवासाची परवानगी, 10वी, 12वी चा निकाल 'या' तारखेपर्यंत लागण्याची शक्यता.
दरम्यान महाराष्ट्रात यंदा 10 वीच्या बोर्ड परीक्षेला सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. राज्यात 4979 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र बोर्डाकडून 9 विभागीय मंडळातून म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण मध्ये त्याचे आयोजन केले होते. मात्र राज्यात वाढणारा कोरोनाचा धोका पाहून 23 मार्चचा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला. आता जशी निकालाची वेळ जवळ येत अशी विद्यार्थी आणि पालजांच्या मनात या रद्द झालेल्या विषयाच्या गुणपद्धतीबद्दल आणि एकूण निकालाच्या पदधतीबद्दल धाकधूक वाढत होती.
महाराष्ट्रामध्ये अजूनही कोरोनाचं संकट कायम आहे मात्र लॉकडाऊनामध्येही विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचं काम आणि निकाल लावण्याचं कम सुरू आहे. संबंधित शिक्षक आणि अन्य कर्मचार्यांना लॉकडाऊनमध्ये मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा जून महिन्याच्या मध्यापर्यंत दहावी- बारावीचे निकाल लागू शकतात. परंतू पुढील शैक्षणिक वर्षाबाबत अद्याप सरकार किंवा शिक्षण मंडळाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.