Bhagat Singh Koshyari, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे भूतकाळातील आदर्श असल्याच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कडाडून टीका झाली. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात शांततापूर्ण राज्यव्यापी बंदचा विचार करत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी केली. यावेळी संजय राऊत यांनी कोश्यारी आणि भाजपवर सडकून टीका केली.

राऊत यांनी आज सामनामधील रोकठोक या त्यांच्या साप्ताहिक स्तंभात लिहिले की, ‘मुस्लिम देशांनी नुपूर शर्माच्या पैगंबराबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केल्यावर तिला पक्षातून निलंबित करण्यात आले. मात्र, आता भाजप केवळ गप्प बसत नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्राला नपुंसक बनवण्याचा डाव आहे,’ असा दावा त्यांनी केला.

याआधी ठाकरे यांनी, विविध राजकीय पक्षांना राज्यपालांच्या विरोधात एकत्र येण्याचे आणि राज्यपालांना परत बोलावण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन केले होते. ठाकरे म्हणाले की, ‘मी तीन ते पाच दिवस वाट पाहीन. त्या काळात मी राज्यातील विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधून राज्यपालांच्या विरोधात एकजूट करणार आहे. मी कोश्यारीच्या विरोधात शांततापूर्ण राज्यव्यापी बंद ठेवण्याचा विचार करत आहे.’

संजय राऊत म्हणाले की, ‘कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती किंवा साताराचे उदयनराजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. ते (ठाकरे) असेही म्हणतात की, भाजप ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत, ते पाहता आपण सर्वांनी एकत्र यावे. या संदर्भात आक्रमक पावले उचलण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.’ (हेही वाचा: दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, म्हणाले - कोणाला खोके दिले, ते एक दिवस नक्की सांगेन)

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्या राज्यव्यापी बंदच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. कोणताही राजकीय पक्ष अल्टिमेटम देऊ शकतो. कोणालाही अल्टिमेटम देण्याचा अधिकार आहे.’