Rohit Pawar (pc -ANI)

खेड-शिवापूर टोल (Khed-Shivapur Toll Plaza) नाक्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी एक वाहन पकडले. ज्यामध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोखड असल्याचे आढळून आले. या रकमेवरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. दरम्यान, विरोधकांनी ही रोखड सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत आणि त्यांच्यासारख्याच काही नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचने नते आमदार शहाजी बापू पाटील यांचा संबंध असल्याचे म्हटले आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट

आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स (जुने ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहीली आहे. ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ जुनाच असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष या व्हिडिओची सत्यता आणि तथ्यता पडताळत असल्याचे समजते.

कथीत व्हिडिओ

एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

आमदार रोहित पवार यांनी आपल्या याच पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कथित व्हिडिओचे खंडण

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांना सापडलेली रोखड आणि त्यांची एकूण किंमत यावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे. राऊत यांनी थेट आरोप करत आमदार शहाजीबापू पाटील यांचे नाव घेतले आहे. ज्यामध्ये ही रक्कम आमदार पाटील यांचीच असल्याचा त्यांचा दावा आहे.