महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019:  शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघ  का निवडला?
Shiv Sena (Photo Credits: Twitter/ Shiv Sena)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी आज वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Vidhan Sabha Election) आज (3 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला आहे. आदित्यच्या रूपाने पहिल्यांदा ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ शिवसेना नव्हेच तर ठाकरे घराण्यासाठीदेखील खास ठरणार आहे. अद्याप मनसे किंवा राष्ट्रवादी पक्षाने आदित्यच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. आदित्यसाठी महाराष्ट्रातही इतर विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली होती मात्र अखेर वरळी विधानसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे 'करोडपती'; 11 कोटी 38 लाखांच्या संपत्तीमध्ये BMW कार, सोनं ते शेत जमिनीचा समावेश

वरळी विधानसभा मतदार संघ

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. म्हणूनच आगामी सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेल्या आदित्य ठाकरेसाठी वरळी मतदार संघाची निवड करण्यात आली. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेचे सुनिल शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सचिन अहीर यांच्यांमध्ये चुरस झाली होती. मात्र आदित्यसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी हा मतदारसंघ यंदा सोडला आहे. सोबतच सचिन अहीर देखील शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत.

1990 पासून शिवसेनेचा वरळी विधानसभा मतदारसंघावर पगडा आहे. 1990 ते 2014 या काळात सहा वेळेस विधानसभा जिंकली आहे. तर केवळ एक वेळेस एनसीपी या मतादार संघावर विजय मिळवू शकली आहे. आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया.

बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली शिवसेना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून कोणत्याही ठाकरेंनी निवडणूक लढली नाही. 2014 साली राज ठाकरे निवडणूकीच्या मैदानात उतरणार अशी चर्चा होती. मात्र ते निवडणूकीत उतरले नाहीत. आदित्य ठाकरे 29 वर्षीय आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक विषयांमध्ये ठोस राजकीय भूमिका घेतल्या आहेत.