आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया
Aditya Thackeray filed his nomination For Maharashtra Assembly Elections | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा स्वीकार केल्याबद्दल वरळीतील जनतेचे, कट्टर शिवसैनिक आणि सुनिल शिंदे यांचे आभार. ठाकरे कुटुंबियांमध्ये आजवर माझ्यापर्यंत कोणीही निवडणूक लढवायची नाही असा आमच्या कुटुंबाचा निर्णय होता. पण, आता ठाकरे कुटुंबातील (Thackeray Family) नवी पिढी पुढे येत आहे. नव्या पिढीने थेट राजकारणात यावे अशी, जनतेची इच्छा आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधनसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या वेळी आदित्य ठाकरे यांचे वडील आणि शिवसेना (Yuva Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने उमेदवार दिला नाही. याबद्दल प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारले. या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. उद्धव ठाकरे म्हणाले 'आदित्यला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत आहेत. त्या सर्वांचे आभार', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या देशांमध्ये तरुण पिढी राजकारणात येते आहे. या पिढीकडे एक नवा विचार आहे. त्यामुळे या देशाचे नेतृत्व तरुण पिढीने करावी अशी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे आपणही तरुण पिढीला संधी दिली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे निवडणूक अर्ज दाखल करत असताना आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे,  शिवसेना नेते, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत.