अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन नंबरचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा बारामतीतून निवडणुकीत विजयी झाले आहे. राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या, बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघातून एकूण 10 उमेदवारांनी अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण, पवार यांना कोणीही स्पर्धा देऊ शकले नाही. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी बारामती विधानसभा मतदारसंघात 1,65,265 मतांनी विजय नोंदवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित यांना 1,94,317 मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांना 30,282 मते मिळाली. अजित यांनी 1 लाख 64 हजार 035 मतांच्या अंतराने पाडळकरांचा पराभव केला आणि सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पवार यांचा बारामतीतील हा विक्रम मोडणारा विजय आहे. (पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले यांच्यासह या पाच उमेदवारांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ही जागा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानली जाते. 2014 मध्ये अजित यांनी या जागेवर 89,791 मतांनी विजय मिळविला होता. या विजयासह अजित पवार बारामतीतून सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. दरम्यान, सर्वात जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे लातूर (Latur) ग्रामीणमधील उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) आहे. धीरजच्या विरोधात शिवसेनेचे सचिन उर्फ रवी रामराजे देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. धीरजना 1 लाख 33 हजार 161 मत मिळाली, तर रामराजे देशमुखांना फक्त 13,335 मतांवर समाधान मानावे लागले. यानुसार, धीरज यांनी 1 लाख 19 हजार 826 मतांनी विजय मिळवला. नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार यांनी 1,17,061 मतांनी विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण 62,484 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. पवार यांच्या विजयचे अंतर 54,577 मतांचे होते.

एकूण 288 जागांपैकी आतापर्यंत 169 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप-शिवसेना युतीने 160 जागांवर आघाडीवर आहे, तर 99 जागांवर राष्ट्रवादी-काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आतापर्यंत 63 जागा जिंकल्या आहेत.