Mahad Building Collapse: महाड येथील इमारत दुर्घटनेबाबत 5 जणांवर गुन्हा दाखल; RCC Consultant बाहुबली धमाणे यास अटक
Building Collapses in Mahad (Photo Credits-ANI)

रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) शहरातील काजलपुरा भागात सोमवारी कोसळलेल्या पाच मजली रहिवासी संकुल तारिक गार्डनच्या  (Tariq Garden Building Collapse), संबंधात रायगड पोलिसांनी बुधवारी एकास अटक केली. या दुर्घटनेत एकूण 16 लोकांचा मृत्यू झाला होता, ही दुर्घटना घडल्यानंतर 42 तासांनी बुधवारी दुपारी बचाव कार्य पार पडले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Reinforced Cement Concrete सल्लागार बाहुबली धमाणे (Bahubali Dhamane) या व्यक्तीला त्याच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली, तर नवी मुंबईतील डेव्हलपर फारूक काझी याचा शोध सुरू आहे. बुधवारी त्याच्या घराला कुलूप असल्याचे आढळले.

आरसीसी सल्लागार म्हणून धमाणे, 2013 मध्ये पूर्ण झालेल्या तारिक गार्डनच्या  बांधकामात वापरल्या गेलेल्या डिझाइन आणि साहित्याची जबाबदारी सांभाळत होता. याबाबत रायगडचे पोलिस अधीक्षक (एसपी) अनिल पारस्कर म्हणाले, 'ढिगाऱ्याच्या फोरेन्सिक तपासणीद्वारे आमच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, इमारत बांधण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री चांगल्या प्रकारची नव्हती. बचाव कार्यात सामील झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) चमूने आम्हाला सांगितले की, खालच्या दर्जाचे साहित्याचा वापर केल्यामुळेच ही इमारत कोसळली.'

याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाच जणांपैकी धमाणे याला स्थानिक कोर्टाने 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पाचही जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. धमाणे व काझी व्यतिरिक्त पोलिसांनी ज्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये, महाड नगरपरिषदेचे माजी सभापती दीपक झीसंद, महाड नगरपरिषदेचे कनिष्ठ बांधकाम निरीक्षक शशिकांत दिघे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: भायखळा मधील मिश्रा इमारतीचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेत 12 वर्षीय मुलीसह 70 वर्षीय महिलेचा मृत्यू-BMC)

दरम्यान, तारिक गार्डनची इमारत कोसळल्यानंतर दोन दिवसानंतर, जिल्हा प्रशासनाने कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या समावेशाने एक समिती स्थापन केली असून, त्यास ढिगाऱ्यामधील दागिने, रोकड व मौल्यवान वस्तू शोधून त्या-त्या मालकास त्या परत देण्यात आल्या, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.