Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) पक्षात मोठी बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संघटना सावरण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. दरम्यानच, शिवसेनेतील बंडाळीसोबतच महाविकासआघाडीही (Maha Vikas Aghadi) फुटली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या चर्चेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पूर्णविराम दिला आहे. महाविकासआघाडी एकत्र आहे. ती फुटली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकासआघाडीतील नेत्यांची एक बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेसुद्धा या वेळी उद्धव ठाकरे यांच्या समवेत होते.

राज्यात महाविकासाघाडी सरकार कोसळले. त्यामुळे महाविकासाघाडीला सध्या विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. अशातच आगामी काळात मुंबई, ठाणे आणि राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकासाघाडीची एक बैठक आज विधिमंडळात पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले की, आपण कोरोना महामारीशी दोन हात केले आहेत. कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आले असताना आपण त्या संकटाला सामोरे गेलो. त्यामुळे त्या संकटापुढे हे संकट काहीच नाही. आता निर्माण झालेल्या संकटाचा सामनाही आम्ही महाविकासआघाडी म्हणूनच करु, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

देशातील जनता आणि न्यायदेवता यांच्यावर मला विश्वास आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक राज्यात आणि देशात बेबंधशाही आणणार नाहीत, यावर माझा विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे. पण जनता सगळे उघड्या डोळ्यांनी पाहात असते. लोकशाहीमध्ये जनता आणि न्यायदेवता दोघेही महत्त्वाचे आधारस्थंभ असतात. जोवर हे दोन्ही खांब मजबूत आहेत तोवर काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.