शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी केलेल्या बंडानंतर पक्षप्रणित महाविकास आघाडी सरकार कोसळून नवे सरकार स्थापन झाले आहे. अशात आता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गणपती उत्सवानंतर राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा (Maha Prabodhan Yatra) काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून होणार आहे. ठाकरे यांनी तरुण आणि वृद्ध शिवसैनिकांच्या सक्रिय सहभागाने पक्ष संघटनेला नवसंजीवनी देत पुनरुज्जीवन करण्याची त्यांची योजना आधीच जाहीर केली आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील पहिल्या सभेला ते संबोधित करतील. या ठिकाणाहून माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी जोमाने काम सुरु केले होते. बंडखोरी करणाऱ्या शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याने, उद्धव ठाकरे यांनी टेंभी नाक्याची निवड केली आहे.
प्रस्तावित महाप्रबोधन यात्रेचा समारोप कोल्हापूर येथील बिंदू चौकात होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याकडून राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदार आणि काही आमदारांनी पक्षाचा त्याग करून शिंदे छावणीत प्रवेश केला आहे. म्हणूनच समारोपासाठी कोल्हापूरची निवड केली गेली आहे.
सध्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान, आदित्य गर्दीला आकर्षित करताना दिसत आहेत. या प्रस्तावित महाप्रबोधन यात्रेद्वारे, पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याची ठाकरे यांची योजना आहे. (हेही वाचा: '50 खोके...एकदम ओके' घोषणाबाजीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री; काय म्हणाले शिवसेनाप्रमुख? जाणून घ्या)
महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने मिशन 45 ची घोषणा केली आहे. तसेच नवीन सत्ताधारी शिंदे कॅम्पसह राज्य विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या यात्रेची घोषणा झाली आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांनी बंडखोर आमदारांना राजीनामा देऊन नव्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे.