
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. आधी शिवसेनेत फुट पडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडून अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रात भाजपची कोंडी होऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जागावाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत भाजपची डोकेदुखी वाढली आहे, कारण अजित पवार गटाची मागणी आहे की त्यांनाही एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा हव्या आहेत. ही माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी एका खासगी माध्यमाला दिली आहे.
अहवालानुसार, आज अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जानेवारीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाआघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होणार आहे. या बैठकीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या महिन्यात ही बैठक होणे अपेक्षित होते, मात्र विविध राज्यांतील मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन आणि महाराष्ट्रात विधानसभेचे अधिवेशन यामुळे बैठक लांबली.
अशात शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला हव्या आहेत, अशी अजित पवार गटाची भूमिका आहे. तेही सत्तेत समान भागीदार आहेत, असा पवित्रा अजित पवार गटाने घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महाआघाडीतील जागावाटपाबाबत अजित पवार यांच्या गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या अजित पवार गटाकडे 4 तर शिंदे गटाकडे 13 खासदार आहेत. महाआघाडीत भाजपचे 105 आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांचे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 43 आमदार आहेत. (हेही वाचा: Ajit Pawar News: टाळले की नाकारले? अजित पवार बोललेच नाहीत, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर थेट राज्यपालच! घ्या जाणून)
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, ते जानेवारीत महाराष्ट्रातील घटक पक्षांची बैठक घेणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी एकनाथ शिंदे गट आणि भाजप नेत्यांसोबत बैठक घेणार असून जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. महाआघाडीतील जागावाटपाबाबतची स्थिती अमित शहांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. अशा स्थितीत आता जानेवारीत कोणत्या गटाच्या जागांची लॉटरी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.