अजित पवार (Ajit Pawar) हे तसं मोकळं ढाकळं व्यक्तीमत्व. त्यातही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीसुद्धा. त्यामुळे सहाजिकच ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्या कार्यक्रमात त्यांना भाषणास प्राधान्य देणे हा प्रोटोकॉलच. पण, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन (50th National Children’s Science Exhibition) कार्यक्रमात मात्र काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे भाषण झाले. त्यानंतर संकेतानुसार अजित पवार यांचे नाव पुकारले जाणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात मात्र राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais) यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. दादांनी स्वत:च बोलणे टाळले की, आयोजकांनी त्यांना बोलण्यासाठी नाकारले? अशी नवीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दादा नंतर 'दादा' बोललेच नाहीत!
चंद्रकांत पाटील यांच्यानंतर प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांचे नाव न पुकारता निवेदकाने थेट राज्यपाल रमेश बैस यांचे नाव भाषणासाठी पुकारले. त्यामुळे उपस्थितांना काही काळ निवेदकच नाव वाचताना चुकला असेल किंवा त्यांच्याकडून नजरचुकीनेच नाव घेणे राहुन गेले असावे, असे वाटले. पण नेमके काय घडले. दादा का नाही बोलले. याबाबत राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. खरे तर राजकारण म्हटले की, घडलेल्या घटना आणि त्याचा संबंध कोणत्याही प्रकारे लावला जातो. त्यावर योग्य वेळीच खुलासा होणे आवश्यक असते. अन्यथा, त्याचा वेगळाच अर्थ काढला जातो. त्यामुळे आता दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याकडून आणि आयोजकांकडून खुलासा होईल, तेव्हाच नेमके काय घडले याबबत माहिती मिळू शकणार आहे. तोपर्यंत उलटसुलट चर्चा सुरुच राहणार आहेत. (हेही वाचा, 2024 Lok Sabha Elections: 'आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही'; उपमुख्यमंत्री Ajit Pawar)
कोठे घडला हा प्रकार?
पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात आले होते. ज्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषणावेळी अजित पवार यांच्यासोबत हा प्रकार घडल्याच पुढे आले आहे.