Maharshtra Political Updates: महाविकासआघाडी जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? याबाबत विरोधक आणि प्रसारमाध्यमे नेहमीच प्रश्न विचारतात. पण गंमत अशी की, हाच प्रश्न सत्ताधारी महायुतीसमोर उभा ठाकला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) पक्षाने 22 जागांवर दावा सांगितला आहे. तर भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात 'मिशन-45' आगोदरच जाहीर केले आहे. हे कमी की काय म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार, खासदारांचा एक गटही भाजप आणि शिंदे यांच्या सेनेसोबत आला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची आणि त्यांच्या मित्रपक्षांची लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या जगावाटपात चांगली कसोटी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने केलेला 22 जागांचा दावा हा भाजप आणि अजित पवार गटासाठीही कळीचा मुद्दा ठरु शकतो. दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिंदे गटाला 13 जागा सोडण्यावर भाजप राजी आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तसेच, जागावाटपाचे निश्चित सूत्रही ठरल्याचे ऐकिवात नाही. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जागावाटपावरुन कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र बसून त्यावर तोडगा काढतील.
राहूल शेवाळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महायुतीतत ताणाताणी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, त्यांनी म्हटले आहे की, शिंदे गटातील एकाही विद्यमान खासदाराची जागा सोडली जाणार नाही. त्यामुळे आमचा एकूण 22 जागांवर दावा कायम आहे. शिवाय, शिंदे समर्थक राहिलेले 13 खासदार पुन्हा निवडणूक लढतील, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदारांच्या बैठकीत लोकसभेच्या 22 जागांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शेवाळे बोलत होते.
शिंदे गटाकडून केला जाणारा लोकसभेच्या 22 जागांचा दावा, दुसऱ्या बाजूला भाजपचे 'मिशन-45' तर मग अजित पवार गटाकडून लोकसभेला किती जागांचा दावा? असा प्रश्नआता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातो आहे. काही जागा युतीसाठी वादग्रस्त ठरु शकतात. उदा. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये रायगड येथून सुनिल तटकरे खासदार आहेत. जे सध्या अजित पवार गटात आहेत. या ठिकाणची जागा शिवसेच्या अनंत गिते यांनी लढवली होती. जे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या जागेवर उमेदवार द्यायचा की, ती जागा अजित पवार गटाला सोडायची याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला शिरुर येथून शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना पक्षाकडून रिंगणात होते. मात्र, त्या ठिकाणी सध्या शरद पवार गटाकडे असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले आहेत, अशा स्थितीत महायुतीमध्ये जागावाटपावरुन पेच निर्माण होतो की, काय अशी चर्चा आहे.