Lok Sabha Election 2024: मतदान केंद्रावर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

भिवंडी (Bhiwandi) लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पहायला मिळाली. या ठिकाणी दोन वेळचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचे आव्हान होते. तसेच जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी देखील या दोघांच्या विरोधात मोठे आव्हान उभे केले आहे होते. या ठिकाणी काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि अधिकारी पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Election Commission Clarification On Polling In Mumbai: मुंबईमध्ये मतदान केंद्रावर रांगाच रांगा, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण; उद्धव ठाकरे यांचा घणाघात, वाचा सविस्तर)

भिवंडी शांती नगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 186,504,506, कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर पोलिसांना केलेली शिवीगाळ कपिल पाटील यांना भोवली आहे. कपिल पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दादा गोसावी, भाजपचा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर कपिल पाटील तिथं पोहोचले होते. यावेळी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर टीका करण्यात आली होती.