पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  संकटकाळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जोडीने पोलीस सुद्धा अहोरात्र राबत आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. असाच एक प्रकार नुकताच सोलापूर (Solapur) मध्ये घडला आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मळोली गावात लॉक डाऊन दरम्यान गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समजतेय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. अरूणसिंह फत्तेसिंह जाधव असे यातील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या भावाच्या हॉटेलची तपासणी जामदार यांनी केली होती त्याचा राग काढत हा हल्ला केल्याचे समजत आहे. Lockdown मध्ये बाहेर फिरताना रोखल्याने तिघांनी मिळून पोलिसांवरच केला हल्ला; पिंपरी- चिंचवड मधील धक्कादायक प्रकार

प्राप्त माहितीनुसार, वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जावेद जमादार यांना लॉक डाऊन काळात नियम मोडून काही व्यक्ती मळोली गावात आल्याचे समजले. याची तपासणी करण्यासाठी जामदार हे अन्य एका पोलिसासह मळोली गावी गेले. इथे थांबून पोलीस पाटीलांची वाट पाहत असताना आरोपी अरूणसिंह जाधव तेथे आला आणि त्याने जामदार यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रथमतः जामदार यांना अरुणसिंह याचा राग का आहे हेच समजले नाही त्यावर उत्तर देताना साळमुख चौकातील माझ्या भावाच्या हॉटेलची तपासणी का केली, असा जाब अरुणसिंह विचारू लागला. पुन्हा आमच्या हॉटेलची तपासणी केली तर याद राख, अशा धमक्या सुद्धा अरुणसिंह याने दिल्या.

दरम्यान, पोलीस कर्मचारी जावेद जमादार यांच्यावर लाथाबुक्क्याने, ब्लेडने वार करण्यात आले, त्यांच्या अंगावरील गणवेश सुद्धा फाडण्यात आला, यानंतर त्यांना पेट्रोल ओतून जाळणार इतक्यात सुदैवाने होमगार्ड पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जामदार यांचा जीव वाचवला. या हल्ल्याच्या दरम्यान जामदार हे जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.