पिंपरी-चिंचवड (Pimpari- Chinchwad) येथील काळेवाडी परिसरात संचार बंदी असताना रस्त्यावर फिरणाऱ्या तिघांना थांबवल्याने याच तिघांनी मिळुन पोलिसालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनाकारण बाहेर फिरत असताना पोलिसांनी या तरुणांना हटकले होते मात्र या वेळी या तरुणांनी पोलिसांच्या हातातील काठी खेचून घेत त्यांनाच मारायला सुरुवात केली. युनूस गुलाब आत्तार,(वय वर्ष 50), मतीन युनूस आत्तार (वय वर्ष 28) आणि मोईन युनूस आत्तार (वय वर्ष 24) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई शंकर विश्वबर कळकुटे यांना या तिघांनी मारहाण केली होती. याप्रकरणी, कळकुटे यांनी अधिकृत तक्रार नोंदवली असता आता वाकड पोलिसांनी (Wakad Police) त्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Coronavirus: पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पटीने वाढतोय, नागरिकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
कळकुटे यांच्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी विनाकारण रस्त्यावर फिरत होते, या भागात संचार आणि जमावबंदी लागू आहे त्यामुळे कळकुटे यांनी त्यांना हटकून घरी जाण्यास सांगितले. मात्र त्यावेळी युनूस आत्तार आणि त्यांच्या दोन मुलांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यातील मतीन या आरोपीने कळकुटे यांच्या हातातील काठी खेचून त्याच काठीने त्यांना मारायला सुरुवात केली तर अन्य दोघांनी कळकुटे यांना लाथाबुक्क्याने मारायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर कळकुटे यांना या तिघांनी जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. या आरोपींपैकी मतीन हा रेल्वे पोलीस विभागात कर्मचारी आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, असाच प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये सुद्धा घडला होता. औरंगाबादमध्ये नमाजासाठी काही लोक एकत्र आले असता त्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात एका पोलीस आधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर संबंधित 27 हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.