देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आढळून आला आहे. नागरिकांनी घरातच थांबावे असे वांरवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडत लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. या कारणामुळे पोलिसांकडून आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभराची आकडेवारी जाहीर केली. त्याचवेळी त्यांनी पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पटीने वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची लवकरात लवकर माहिती घेत त्यांची चाचणी करणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
पुणे येथे केंद्रीय पथकाकडून पिंपरी-चिंचवड, बारामती, स्थलांतरित मजूरांसह अन्य महत्वाच्या ठिकाणी पाहणी केली. त्यानुसार केंद्रीय पथकाकडून काही सुचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. पुण्यात सकाळच्या वेळेस नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सकाळच्या वेळेस घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी पडलेल्या नागरिकांकडून कसरतीचा तास करुन घेतल्याचे दिसून आले आहे. तर आज पुण्यात 55 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.(मुंबई: BMC च्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने 300 पेक्षा अधिक नर्सिंग होमला पालिकेकडून टाळंं)