गेल्या काही दिवसांपासून राज्यात, मुख्यत्वे मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे. या वाढीनंतर मुंबईतील रुग्णांचे रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारपर्यंत शहरातील रुग्णालयांमध्ये 215 रुग्ण दाखल झाले होते, तर एप्रिलमध्ये अशा रुग्णांची संख्या केवळ 65 होती.
रूग्णांच्या संख्येतील या अलीकडील वाढीमुळे कोविड रूग्णांसाठी बेड वाटप करणार्या खाजगी सुविधा अलर्ट मोडवर आल्या आहेत. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ते इतर आजारांनी ग्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, 10 पैकी आठ रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यापैकी दोनपेक्षा जास्त रुग्णांवर इतर आजारांवर उपचार सुरू आहेत.
नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दररोज वाढत आहेत, त्या जिल्ह्यांतील लोकांनी मास्क घालण्यासह काळजी घ्यावी. राज्यात मास्क घालण्याची अनिवार्यता गेल्या महिन्यातच रद्द करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, राज्याच्या आरोग्य विभागाच्या संपूर्ण जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात प्रथमच कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार असलेला BA.4 प्रकारातील 4 रुग्ण आणि BA.5 प्रकाराचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. (हेही वाचा: गरीब महिलांना 1 रुपयात मिळणार 10 सॅनिटरी नॅपकिन, प्रत्येक गावात डिस्पोजल मशीन बसवणार, राज्य सरकारचा निर्णय)
दरम्यान, मुंबईत सोमवारी 318 कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, सलग पाचव्या दिवशी ही संख्या 300 पेक्षा जास्त होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 318 नवीन प्रकरणांपैकी 298 लक्षणे नसलेले आहेत, तर 20 पैकी फक्त तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. दुसरीकडे बीएमसीने येऊ घातलेल्या चौथ्या लाटेचा इशाराही दिला आहे आणि कोविड प्रकरणांच्या वाढत्या संख्येसह मुंबईत सप्टेंबरपर्यंत सर्व जंबो कोविड सुविधा कार्यरत राहतील अशी घोषणा केली आहे.