Phone Stolen On Vistara Flight From Singapore: सिंगापूरहून येणाऱ्या विस्तारा विमानात वकिलाच्या फोनची चोरी; विमान कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गुन्हा दाखल
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

Phone Stolen On Vistara Flight From Singapore: सिंगापूर (Singapore) हून येणाऱ्या विस्तारा विमानात (Vistara Flight) वकिलाच्या फोनची चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नेरुळ, नवी मुंबई (New Mumbai) येथे राहणारे 48 वर्षीय वकील अविनाश हरी फटांगरे यांचा मोबाइल फोन चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सहार पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ते सिंगापूरहून मुंबईला जात असताना विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्यांचा फोन चोरीला गेला. फटांगरे यांनी सांगितलं की, विस्तारा एअरलाइन्सने त्यांना आश्वासन दिले होते की विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते सर्व प्रवाशांच्या बॅगची तपासणी करतील. परंतु, हे आश्वासन पूर्ण करण्यात एअरलाइन अयशस्वी ठरली.

मिड-डेला घडलेली घटनेसंदर्भात सांगताना फटांगरे म्हणाले की, मी 22 मे रोजी विस्तारा एअरलाइन्सने मुंबईला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक UK-108 ने सिंगापूरच्या टूरवरून परतत होतो. रात्री 10:30 च्या सुमारास, मी माझा फोन तपासला, जो मी पुढच्या सीटच्या मागील कव्हरमध्ये ठेवला होता. मला थोडा वेळ झोप लागली आणि जेव्हा मी जागा झालो तेव्हा मला कळले की माझा फोन गहाळ आहे. (हेही वाचा - Vistara Airline: विस्तारा एअरलाइन्सची 38 उड्डाणे रद्द, नागरी उड्डयन मंत्रालयाने मागितले उत्तर)

फटांगरे यांनी त्यांच्या फोनसाठी विमानाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यांनी केबिन क्रूला चोरीची माहिती दिली. त्यांनी एका विशिष्ट प्रवाशाबद्दल संशय व्यक्त केला. केबिन क्रूने त्यांना आश्वासन दिले की, लँडिंग केल्यावर, त्यांची सुरक्षा टीम सर्व प्रवाशांच्या बॅगा तपासेल आणि संशयास्पद प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेईल. तथापी, विमान उतरल्यानंतर प्रवाशांनी उतरण्यास सुरुवात केली. फटांगरे यांनी विनंती करूनही केबिन क्रूने त्यांचा चोरीला गेलेल्या फोनचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. फटांगरे यांनी विनंती करूनही विमान कंपनीने कोणतीही मदन न केल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. (वाचा -Vistara Flight: 'ऑपरेशनल कारणास्तव' विस्तारा विमान सेवा विस्कळीत)

दरम्यान, विमान कंपनीकडून मदत न मिळाल्याने निराश झालेल्या फटांगरे यांनी सहार पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोबाईल चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. एका पोलिस अधिकाऱ्याने 'मिड-डे'ला सांगितले की, त्यांनी विमानातील प्रवाशाचा मोबाइल फोन चोरल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 380 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.