भटका कुत्रा (Stray Dog) चावल्याने रेबीज होऊन कोल्हापूर येथील एका तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर कोल्हापूर शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मनात तीव्र भावना आहेत. या भावना एका पत्राद्वारे व्यक्त करत कोल्हापूरकरांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनाच साकडे घातले आहे. 'कुत्र्यापासून आम्हाला वाचवा' असे म्हणत नागरिकांनी पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोल्हापूरमध्ये कुत्रा चावणे ही बाब आता सामान्य झाली आहे. दररोज कोठे ना कोठे अशी घटना घडल्याचे पाहायला, ऐकायला मिळते. त्यावरुन नागरिक आक्रमक झाले आहेत.
कुत्र्याच्या चाव्यात ग्राफीक डिझायनर तरुणीचा मृत्यू
कोल्हापूर शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. ज्याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अलिकडेच श्रृष्टी सुनील शिंदे (वय २१, रा. विशाळगडकर कंपाउंडजवळ, नागाळा पार्क) नावाच्या एका तरुणीचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला. ती ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती. केवळ कुत्रा चावल्याने एखाद्या तरुणीचा आकस्मीक मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे नागरिक मानतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. कुत्र्यांचा केवळ मानसांवरच हल्ला होत नाही तर शहरातील स्वच्छेचा प्रश्नही कुत्र्यांमुळे गंभीर होतो. अनेकदा भटके कुत्रे कचराकुंडीत टाकलेल्या अन्नाच्या शोधात भटकत राहतात. त्यातील कुजके अन्न, मांसाचे तुकडे घेऊन शहरभर हिंडत असतात, अशा वेळी दुर्गंधी पसरते. त्यातून नागरिकांना आणि प्राण्यांनाही आरोग्याच्या तक्रारी सतावतात, असे नागरिक सांगतात. (हेही वाचा, Viral video: झाड लावण्यासाठी पाळीव कुत्र्याने केली मालकाची मदत, पाहा व्हिडीओ)
ॲनिमल काइंडनेस ॲक्ट रद्द व्हावा
कोल्हापूरकरांनी कुत्रा चावलेल्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहीत ॲनिमल काइंडनेस ॲक्ट रद्द व्हावा अशी मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांवर कोणताही अंकूश राहिला नाही. अनेकदा ग्रामपंचायत ते महापालिका हद्दीपर्यंत कुत्रे उच्छाद घालताना दिसतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची नसबंदी होणे आवश्यक आहे. पण, यंत्रणा निष्क्रिय असल्याने त्यावर काहीच उपाय होत नाही. त्यामुळे कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढते. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने पाहात नाहीत, परिणामी त्याचा त्रास नागरिकांना होतो, असे नागरिकांचे म्हणने आहे. (हेही वाचा, Thane Crime: विष देऊन सहा कुत्र्यांची हत्या, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, ठाण्यात खळबळ)
रेबीज विशाणूजन्य आजार
दरम्यान, रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे. जो सस्तन प्राण्यांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. रेबीज विषाणू, लिसाव्हायरसमुळे आणि संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे पसरते. खास करुन कुत्रा, मांजर चावल्याने हा आजार होतो. रेबीज संक्रमित प्राण्यांच्या लाळेद्वारे किंवा कमी सामान्यपणे, मानवी लाळेच्या संपर्काद्वारे देखील प्रसारित केला जाऊ शकतो.