छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिवशी काही तरुणांनी (7) आक्षेपार्ह स्टेटस लावल्याने कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) तणाव निर्माण झाला आहे. आक्षेपार्ह स्टेटसला आक्षेप घेत कोल्हापूरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी (Hindu organization) आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरातील शिवाजी चौकात पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. परिणामी कोल्हापूरमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली. दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांना (Kolhapur Police) काही ठिकाणी लाठीमार आणि, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. इतकेच नव्हे तर कोल्हापूरमध्ये पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद (Internet Shut Down) ठेवण्याचे आदेशही दूरसंचार कंपन्यांना देण्यात आल्याचे समजते.
समाजकंटकांकडून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडिओ आदी सामग्री पुढे पाठवली जाऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी याबाबत माहिती दिली. शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. ती चांगलीच राहील याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असे अवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. (हेही वाचा, Kolhapur: औरंगजेबासंदर्भातील सोशल मीडिया पोस्टमुळे कोल्हापुरात दंगल; पोलिसांकडून लाठीचार्ज, Watch Video)
शिवाजी चौकातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर कोल्हापूर महापालिका परिसर, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहोल्ला आणि शिवाजी रोड अशा काही ठिकाणी तोडफोड आणि हिंसक घटना घडल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे काही ठिकाणी तणावात आणखीच भर पडली. मात्र, पोलिसांनी मोठा संयम दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जोरादर प्रयत्न केले. सकाळी काहीशी हिंसक झालेली स्थिती दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी बऱ्यापैकी नियंत्रणात आणली होती. त्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
दरम्यान, कोल्हापूरातील मुस्लिम समाजाने एक पत्रक काढून पोलिसांना कारवाईचे अवाहन केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस लावल्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशा तरुणांना कोणीही पाठिशी घालणार नाही. पोलिसांनी अशा समाजकंटकांना शोधून वेळीच ठेचावे. जेणेकरुन समाजात तणाव निर्माण होणार नाही. काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण झालं आहे. पोलिसांनी समाजकंटकांना शोधावे आणि कडक कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाही. प्राप्त माहितीनुसार मुस्लिम समाजाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकावर कादर मलबारी, आदिल फरास, रियाज सुभेदार, अफजल पिरजादे, जाफरबाबा सय्यद, झाकीर कुरणे, तौफीक मुल्लाणी, अब्दुल हमीद मिरशिकारी, मुश्ताक मलबारी, वासीम चाबुकस्वार यांच्या सह्या आहेत.