Election | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election 2020) घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ठरलेल्या वेळेनुसार पार पडणार किंवा नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र, आज ना उद्या ही निवडणूक पार पडणारच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यात सर्वाधिक उत्सुकता आहे महाविकासआघाडीबद्दल. राज्यात महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सत्तेत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतही महाविकासआघाडी एकत्र लढणार की शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) स्वबळ आजमावणार? याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे या वेळी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सामना दुरंगी, तिरंगी, चौरंगी की बहुरंगी रंगणार याबाबत उत्सुकता आहे.

कोल्हापूरातील राजकीय वर्तुळातील सध्याची चर्चा पाहता महाविकासआघाडीतील घटक पक्ष स्वबळावर लढतील असे दिसते. असे घडले तर भाजप-ताराराणी आघाडी विरुद्ध तिन पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) असा चौरंगी सामना रंगू शकतो. पाठीमागील पाच वर्षांचा इतिहास पाहात हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळाले. महापालिका निवडणूक 2015 मध्येही शिवसेना-भाजप सोबत लढली. मात्र, असे असले तरी भाजपला दणका देण्यासाठी शिवसेनेने भाजपला फारसा भाव दिला नाही. तेसच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या आधिच्या निवडणुकीत एकेकटेच लढले होते.

कोल्हापूर महापालिका सध्याची पक्षीय बलाबल

पक्षाचे नाव एकूण जागा
काँग्रेस 27
राष्ट्रवादी काँग्रेस 15
ताराराणी आघाडी 19
भाजप 13
शिवसेना 04
अपक्ष 03 (दोघांचा काँग्रेस, एकाचा ताराराणी आघाडीला पाठींबा)

दरम्यान, अशी चर्चा आहे की, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. मात्र अशाच प्रकारचा त्यांचा समन्वय शिवसेनेच्या नेत्याशी नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला केवळ चारच जागा मिळाल्या आहेत. त्यातच या निवडणुकीची सूत्रे राजेश क्षीरसागर यांच्याकडे जाऊ शकतात असा अनेकांचा कयास आहे. क्षीरसागर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच, शिवसेनेत अनेकांचे पक्षांतर्गत मतभेदही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी होणार काय? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Kolhapur Municipal Corporation Election 2020: कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रभागातील आरक्षण बदलाचे संकेत, अनेकांचे धाबे दणानले; 95% फेरबदलाची शक्यता)

दुसऱ्या बाजूला सध्या कोथरुडचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमधून येतात. त्यामुळे महापालिकेत आपले संख्याबळ वाढविण्यासाठी भाजप काय प्रयत्न करते यावरही बरेच अवलंबून आहे. तसेच, ताराराणी आघाडी काय रणनिती आखणार हेही पाहावे लागणार आहे. ताराराणी आघाडीपाठीमागे महाडीक गटाची मोठी ताकद असते. त्यामुळे एकूणच काय तर यावेळची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मोठी रंगतदार होणार असे दिसते.