Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरात महाविकासआघाडीचा डंका, जयश्री जाधव विजयी; भाजपचा दणदणीत पराभव
Jayashri Jadhav | (File Image)

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur Election Result 2022) भारतीय जनता पक्षाचा (BJP) दणदणीत पराभव झाला आहे. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi ) पुरस्कृत काँग्रेस (Congress ) उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय संपादन केला. जयश्री जाधव यांना 96,226 मते मिळाली. जयश्री जाधव यांच्या खालोखाल भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यांना 77,416 इतकी मते मिळाली. म्हणजेच जयश्री जाधव यांनी 19,000 मतांची मताधिक्य मिळवले. कोल्हापुरच्या निवडणुकीबद्दल राज्यभरातून उत्सुकता होती. पुरोगामी विचारांपासून सुरु झालेली ही निवडणुक अखेरच्या ठिकाणी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन ठेपली. जसजसा प्रचार प्रखर होत गेला तसतसा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखर होत गेला.

विधानसभा निवडणुक 2019 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचे निधन झाले. त्यामुळे दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना महाविकासआघाडीच्या वतीने रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे भाजपने सत्यजित कदम यांच्या रुपात दिलेला उमेदवार पाठिमागच्या वेळी काँग्रेसकडून रिंगणात होता. त्याच कदमांना भाजपने पोटनिवडणुकीत तिकीट दिले. महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना प्रचाराच्या रणधुमाळीत पाहायला मिळाला. (हेही वाचा, हजारांचे मताधिक्य, विजयाकडे वाटचाल)

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव यांनी जोरदार आघाडी घेतली. एखाद्या फेरीचा अपवाद वगळता भाजप उमेदवाराला एकदाही आघाडी घेता आली नाही. प्रत्येक फेरीत भाजप उमेदवार पिछाडीवरच पाहायला मळाला. मतमोजणीसाठी एकूण 26 फेऱ्या पार पडल्या. शेवटच्या फेरीपर्यंत जयश्री जाधव यांनी आघाडी कायम ठेवली. त्यामुळे भाजप उमेदवाराची मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.