Kishori Pednekar Vs Ashish Shelar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर केलेल्या कथीत आक्षेपार्ह टिप्पणी नंतर शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. या टिप्पणीवरुन सुरु झालेल्या शिवसेना-भाजप (Shiv Sena- BJP) वादाचा 'सामना' आगामी काळात अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत झळकलेल्या बॅनरवरुन ही शक्यता अधिक वाढल्याचे दिसते. मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोर हे बॅनर झळकले आहे. राजकीय वर्तुळात या बॅनरची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या बॅनरवर प्रकाशकाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर कोणी झळकावले याबाबत मात्र माहिती समजू शकली नाही.

काय आहे बॅनर?

मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोर झळकलेल्या बॅनरमध्ये खालीलप्रमाणे वाक्यरचना आहे.

कसं काय शेलार बरं हाय का?

काल काय एैकलं ते खरं हाय का?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला.

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

काय आहे प्रकरण?

वरळी येथे झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर भाजप आमदार आशीष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महापौरांवर टीका करताना आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता, असा आरोप आहे. यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) आणि 509 (स्त्री मनास लज्जा होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Kishori Pednekar Vs Ashish Shelar: महापौर किशोरी पेडणेकर यांची तक्रार, आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजुर झाला आहे. त्यांनतर हा वद निवळल्याची चिन्हे असतानाच पुन्हा या बॅनरमुळे शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

वरळी येथील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करताना नायर रुग्णालयात मोठा हालगर्जीपणा झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. आरोप करताना शेलार यांनी म्हटले होते की, ''मोठ्या दुर्घटनांनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात, मात्र तेथे सुरक्षितता नाही. रुग्णांना वेळेवर उपचार देत नाहीत. मुंबईच्या महापौर तर घटनेनंतर ७२ तासांनी तेथे जातात. 72 तास कुठे निजला होतात?'' आशीष शेलार यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असून, शेलार यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.