Kishori Pednekar Vs Ashish Shelar: महापौर किशोरी पेडणेकर यांची तक्रार, आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Kishori Pednekar | (Photo Credit: Twittter)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाजप (BJP) आमदार आशीष शेलार (Ashish Shela) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह (Marine Drive) पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. वरळी येथे सिलिंडर स्फोट (Worli Cylinder Blast Case) झाला होता. या स्फोटावरुन सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिपण्णीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली तक्रार पडताळून पाहावी यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनाच पत्र लिहिले आहे. आपल्यावर आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीत फेरफार करण्यात आल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तक्रारदार हे सत्ताधारी आहेत. त्यांनी माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचे शेलार यांनी नागराळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Fire: वरळी मध्ये बीडीडी चाळीत गॅस सिलेंडरच्या स्फोटातून भडकली आग; 4 महिन्यांच्या बाळासह चार जण होरपळले)

काय आहे प्रकरण?

वरळी येथे झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर भाजप आमदार आशीष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महापौरांवर टीका करताना आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता, असा आरोप आहे. यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) आणि 509 (स्त्री मनास लज्जा होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

वरळी येथील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करताना नायर रुग्णालयात मोठा हालगर्जीपणा झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. आरोप करताना शेलार यांनी म्हटले होते की, ''मोठ्या दुर्घटनांनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात, मात्र तेथे सुरक्षितता नाही. रुग्णांना वेळेवर उपचार देत नाहीत. मुंबईच्या महापौर तर घटनेनंतर ७२ तासांनी तेथे जातात. 72 तास कुठे निजला होतात?'' आशीष शेलार यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असून, शेलार यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.