Mumbai Fire: वरळी मध्ये बीडीडी चाळीत गॅस सिलेंडरच्या स्फोटातून भडकली आग; 4 महिन्यांच्या बाळासह चार जण होरपळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

वरळी (Worli) मध्ये आज (30 नोव्हेंबर) गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 जण भाजल्याची घटना समोर आली आहे. ही आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमाराची घटना आहे. कामगार वसाहती मधील बीडीडी चाळीत (BDD Chawl) ही दुर्देवी घटना घडली आहे. आगीमध्ये होरपळलेल्यांना उपचारांसाठी नायर हॉस्पिटल (Nair Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार वरळीच्या कामगार वसाहतीमधी बीडीडी चाळ नंबर 3 मधील एका घरात आगीचा भडका उडाला. सव्वा सातच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यानंतर घराला आग लागली आहे. आगीचं वृत्त समजताच तातडीने अग्निशमन दल आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सकाळी पाऊणे दहाचा सुमारास या आगीला आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले आहे. Gas Cylinder Weight Complaint: घरी येणार्‍या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये छेडछाड झाल्यास तक्रार कुठे कराल?

ANI Tweet

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, आनंद पुरी (वय 27), मंगेश पुरी (4 महिने), विद्या पुरी (वय 25 वर्षे), विष्णू पुरी (वय 5) अशी जखमींची नावे आहेत. सध्या विद्या आणि विष्णू यांची प्रकृती स्थिर आहे पण अवघ्या 4 महिन्यांचे बाळ मंगेश आणि आनंद पुरी यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या सार्‍यांवर मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.