Kangana Ranaut to Meet Maharashtra Governor: बीएमसीने केलेल्या कारवाईनंतर अभिनेत्री कंगना रनौत उद्या घेणार महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची भेट
Bhagat Singh Koshyari,Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray (PC -PTI, Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranaut) शिवसेनेबरोबर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता कंगना रनौत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे. उद्या, रविवारी संध्याकाळी साडेचार वाजता ही भेट होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीमएमसीने (BMC) कंगना रनौतच्या कार्यालयाचा काही भाग तोडल्यानंतर आता अभिनेत्री राज्यपालांच्या समोर आपली बाजू मांडणार आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील कंगना रनौतची भेट घेतली होते.

तत्पूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कंगना रनौतच्या कार्यालयात बीएमसीची झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत, त्यांनी राज्यपालांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. आठवले म्हणाले की, बीएमसीची कारवाई चुकीची होती. अभिनेत्रीला न्याय मिळायला हवा.

9 सप्टेंबर रोजी कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी प्रवासात असताना बीएमसीने तिच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. त्यावेळी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन ही कारवाई थांबवण्याचे आदेश आणले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षानेही ही कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आल्याचे राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना म्हटले होते. आता याबाबत कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे. (हेही वाचा: कंगना रनौतचा महाराष्ट्र सरकार वर मराठीमधून हल्ला; सीएम उद्धव ठाकरे यांचे 'रावण'च्या रूपातील चित्र केले पोस्ट)

बीएमसीच्या कारवाईनंतर आता कंगना आणि शिवेसेना यांच्यातील वाद चिघळला आहे. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी, कंगना मागे हटायला तयार नाही. आता कंगनाने अजून एक ट्वीट केले आहे. मुख्य म्हणजे हे ट्वीट मराठीमधील असून यामध्ये तिने उद्धव ठाकरे यांचे रावणाच्या (Ravana) रूपातील चित्र पोस्ट केले आहे.  मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन, असे तिने म्हटले आहे.