कंगना रनौत व सीएम उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

9 सप्टेंबर रोजी बीएमसी (BMC) ने अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या कार्यालयावर कारवाई करत, अनधिकृत कामावर हातोडा मारला होता. त्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व महाराष्ट्र सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका करण्यास सुरुवात केली. आता कंगनाने अजून एक ट्वीट केले आहे. मुख्य म्हणजे हे ट्वीट मराठीमधील असून यामध्ये तिने उद्धव ठाकरे यांचे रावणाच्या (Ravana) रूपातील चित्र पोस्ट केले आहे. हे चित्र कंगनाला  तिचे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवले असल्याचे तिने सांगितले आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ‘मला बरेच मीम्स मिळाले आहेत, [उधील मीम माझ्या मित्राने, विवेक अग्निहोत्री याने पाठवली आहे. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन, जय हिंद, जय महाराष्ट्र’

पहा ट्वीट -

महत्वाचे म्हणजे या ट्वीट सोबत जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. चित्रामध्ये समोर शिवाजी महाराज कंगनाच्या रूपातील झाशीच्या राणीला तलवार प्रदान करताना दिसत आहेत व मागे उद्धव ठाकरे व त्यांचे दहा तोंडे रेखाटण्यात आली आहेत. अशाप्रकारे कंगनाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. याआधी तिने एक व्हिडि पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने मा. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. (हेही वाचा: 'तुम्ही कुख्यात गुंड दाऊदचे घर तोडायला गेला नाहीत पण कंगनाचे कार्यालय तोडायला गेलात'; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेवर टिकास्त्र)

मुंबईचा उल्लेख ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ असा करून कंगना रनौत सर्वांच्या टीकेची धनी झाली. त्यानंतर महाराष्ट्रामधील अनेक नेत्यांनी तिच्यावर शाब्दिक हल्ले चढवले होते. कंगनानेही त्यांना ट्वीट व व्हिडिओ यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्याने हा वाद आणखीनच चिघळला. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी, कंगना मागे हटायला तयार नाही. शिवसेनेवर टीका करतानाच तिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही काही प्रश्न केले होते.