Kalidas Kolambkar | X

मुंबई मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज (6 डिसेंबर) हंगामी विधानसभा अध्यक्ष (Pro-Tem Speaker) यांना शपथ दिली जाणार आहे.राजभवनावर हा शपथविधी होणार असून भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे. सलग 9व्यांदा आमदार झालेले कोळंबकर सध्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार आहेत. 40 वर्ष ते आमदार आहेत.

नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी हंगामी विधानसभा अध्यक्षांची नेमणूक केली जाते. मुंबई मध्ये 7,8,9 डिसेंबर दिवशी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.तत्पूर्वी आज राजभवानामध्ये कालिदास कोळंबर यांचा हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ विधी सी पी राधाकृष्णन या राज्याच्या राज्यापालांकडून  दुपारी 1 च्या सुमारास होणार आहे.

कोण आहेत कालिदास कोळंबर?

कालिदास कोळंबकर हे ज्येष्ठ आमदार आहे. यंदा सलग 9व्या वेळेस ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडाळा विधानसभा मतदार संघामध्ये त्यांचे वर्चस्व आहे. नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. कोळंबकर हे मूळचे शिवसैनिक पण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत कोळंबकर देखील कॉंग्रेसमध्ये आले. नंतर राणेंप्रमाणेच ते देखील भाजपा मध्ये आले. 2014 साली मोदींची लाट असताना देखील कोळंबकर आमदार म्हणून निवडून आले होते.

मुंबई मधील विशेष अधिवेशनानंतर 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूर मध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. नक्की वाचा: Maharashtra Winter Session: महाराष्ट्रात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर मध्येच का घेतलं जातं? जाणून घ्या यामागील कारण.

हंगामी अध्यक्ष म्हणून,कालिदास कोळंबकर 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील, 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 15 व्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची  निवडणूक होणार आहे.