प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी, असा खोचक टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रामाच्या नावे राजकारण करणं वेगळी गोष्ट आणि भक्ती करणं वेगळी गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला असतो. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही. त्यांना करावं वाटतंय ते करत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल, ते त्यांनी रामाच्या नावावर केलं, असा आरोपही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. (हेही वाचा - Ayodhya Ram Mandir: राम जन्मभूमी मंदिराच्या भूमी पूजन सोहळ्याआधी 'अशी' सजली अयोध्या नगरी (Watch Video))
दरम्यान, येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, भाजप नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार आदी उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचे कोरोना व्हायरस ने निधन; योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द)
भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली अयोध्येत तयारी सुरू आहे. शनिवारी मंदिर परिसरात रंगबेरंगी लाईट्स, दिवे लावून सुशोभिकरण करण्यात आलं होतं. आज योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पाहणीसाठी जाणार होते. मात्र, उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमला वरुण यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे.