अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जेट एअरवेजचा (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) आणि त्याचे कुटुंबीय तसेच कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने मेसर्स जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (JIL) मधील मनी लॉन्ड्रिंग तपासणीचा भाग म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार 538.05 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतात आहेत.
या संलग्न मालमत्तांमध्ये मेसर्स जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (JIL) चा संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल याच्यासह त्याची पत्नी श्रीमती अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्या नावावर नोंदणी असलेल्या 17 निवासी सदनिका/बंगले आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे.
कथित फसवणुकीच्या प्रकरणात जेट एअरवेज, गोयल, त्याची पत्नी अनिता गोयल आणि कंपनीचे काही माजी अधिकारी यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आला होता की, त्यांनी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडला 848.86 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित होते. एअरलाइन्सच्या नावावर घेतलेले कर्ज मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून अन्य कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तपास यंत्रणेने म्हटले होते की, जेट एअरवेजच्या संस्थापकाने परदेशात विविध ट्रस्ट तयार करून भारतातील पैशांची परदेशात उधळपट्टी केली. आरोपीने परदेशात अनेक ट्रस्ट तयार केले असून त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्याने विविध स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यात म्हटले आहे की, या ट्रस्टसाठी वापरलेला पैसा हा भारतातून परदेशात पाठवलेल्या गुन्ह्यांचा (पीओसी) पैसा आहे.
ईडीने सांगितले की, गोयलने मुंबईतील उच्च-किंमत मालमत्ता खरेदी केल्या आणि नंतर त्या विकल्या. त्याने भारतात कंपन्यांचे नेटवर्कही तयार केले ज्याद्वारे त्याने बरीच स्थावर मालमत्ता मिळवली. ऑडिट अहवालाचा हवाला देऊन, ईडीने असा दावा केला आहे की, जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडने घेतलेले कर्ज फर्निचर, पोशाख आणि दागिने यासारख्या स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले गेले. (हेही वाचा: BJP MLA Tamil Selvan यांना विशेष न्यायालयाकडून 2017 च्या बीएमसी अधिकार्यांवर हल्ला प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा)
यासह गोयल याच्या निवासी कर्मचार्यांचे पगार आणि त्याच्या मुलीच्या मालकीच्या प्रॉडक्शन कंपनीच्या कामकाजाचा खर्चही जेआयएल खात्यातून देण्यात आला. गोयल याला ईडीने 1 सप्टेंबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली होती. तो सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.