Accident (PC - File Photo)

जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस थेट पूलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती.  (हेही वाचा - Mumbai Police Viral video: पाऊस आणि गणेश विसर्जन दरम्यान चर्नी रोड स्टेशनवर अडकलेल्या एका व्यक्तीची आणि त्याच्या 5 महिन्यांच्या मुलाची मुंबई पोलीसांनी अश्या प्रकारे केली मदत)

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  मध्यरात्रीच्या सुमारास ती बदनापूरयेथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. ही घटना छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घडली.

अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून जखमेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.