Oxygen Express (Photo Credits: Twitter/PBNS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा मोडून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्यातील ऑक्सिजनची (Oxygen) गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) धावणार आहे. उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccination in India: कोविड-19 लसीकरणात भारताने पार केला 12 कोटींचा टप्पा

17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली. टँकर हे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील, असा निर्णय झाला. रिकामे टँकर कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायझॅक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील.

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकरर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर ठेवले जाणार आहेत. वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.