देशात कोविड-19 (Covid-19) संसर्गाचे थैमात पाहायला मिळत असताना एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतात 92 दिवसांत तब्बल 12 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. इतक्या कमी वेळात लसीकरणाचा मोठा टप्पा गाठणारा भारत (India) हा सर्वात वेगवान देश ठरला आहे. यासाठी अमेरिकेला (America) 97 तर चीनला (China) 108 दिवस लागले होते. (लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून)
भारतात 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठी मोहिमेचा भाग म्हणून देण्यात आलेल्या लसींनी आता 12 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 18,15,325 सत्रांमध्ये तब्बल 12,26,22,590 लसींचे डोसेस देण्यात आले आहेत. यात 91,28,146 आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून 57,08,223 आरोग्यसेवकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. 1,12,33,415 फ्रंटलाईन वर्कर्संना लसीचा पहिला डोस मिळाला असून 55,10,238 वर्कर्संना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.
याशिवाय, 60 वर्षांवरील 4,55,94,522 लसीचा पहिला डोस तर 38,91,294 नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. 45 वर्षांवरील 4,04,74,993 नागरिकांना लसीचा पहिला डोस तर 10,81,759 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
देशात दिवसाला 26 लाख लसींचे डोसेस देण्यात येतात. 17 एप्रिल रोजी 26,84,956 लसींचे डोसेस देण्यात आले. 39,998 सत्रात 20,22,599 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 6,62,357 नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला.
दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे भयंकर रुप दिसत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येत आज 2,61,500 नव्या रुग्णांची भर पडली असून 1,501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,38,423 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 18,01,316 सक्रीय रुग्ण आहेत.