शिर्डी साई बाबा मंदिर व मुंबई सिद्धिविनायक मंदिर

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या (India-Pakistan Tension) पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अशात महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध असणाऱ्या दोन मंदिरांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) आणि शिर्डीमधील श्री साई बाबा मंदिर (Sai Baba Temple) यांनी सावधगिरीचे पाऊल उचलत आज 11 मेपासून, मंदिरांमध्ये नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरती असली तरी ती पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहे. सुरक्षेच्या धोक्याच्या भीतीमुळे मंदिरात फुलांचे हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन कुमार त्रिपाठी म्हणाले, फुलांचे हार आणि नारळांना परवानगी नाही, परंतु दुर्वा वाहण्यास परवानगी आहे. मंदिरात फुले आणि नारळ घालण्यावरील बंदी ही विद्यमान सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग आहे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल. याबाबत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने म्हटले आहे की, शिर्डी येथे दिनांक 2 मे 2025 रोजी एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये श्री साईबाबांचे मंदिर स्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

India-Pakistan Tension:

ते पुढे म्हणतात, या गंभीर परिस्थितीचा विचार करून, साई भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी, श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, दिनांक 11 मे 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत, श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल इत्यादी कोणतीही वस्तू नेण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. सर्व साईभक्तांना या बदलांची नोंद घ्यावी आणि संस्थान व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. आपल्या सर्वांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी उचललेल्या या पावलांना आपण समजून घ्याल, अशी अपेक्षा आहे.’ (हेही वाचा: Sant Dnyaneshwar Maharaj Gyanpeeth: भागवत धर्मातील विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे उभे राहणार 'संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ'; सरकारकडून तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद)

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आता संपुष्टात येत आहे. भारताच्या कठोर कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. भारताने अद्याप सिंधू पाणी करारावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, म्हणजेच हा करार सध्या तरी स्थगित राहील. भारताने असेही म्हटले आहे की कोणतीही दहशतवादी घटना युद्धाची कृती मानली जाईल. भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला एनएसए अजित डोभाल यांच्यासह तिन्ही लष्करप्रमुखही उपस्थित होते.