वर्धा जिल्ह्यात शेतकरी संघटनेकडून ‘मी पण गुन्हेगार’ आंदोलनाला सुरूवात
Cotton | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारने मनाई केलेल्या एचटीबीटी (HTBT) बियाण्यांची लागवड करीत आज वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संघटने (Farmers Association) ने ठिकठिकाणी ‘मी पण गुन्हेगार’ या आंदोलनास सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सरकारकडे एचटीबीटी व जीएम या जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांची लागवड करू देण्याची मागणी उचलून धरली आहे.

दरम्यान, एचटीबीटी व जीएम बियाणे लावणाऱ्यांना सरकारकडून 5 लाख रूपयाचा दंड आणि 5 वर्ष कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, या बियांनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. (हेही वाचा -Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात मान्सूनचा लँडफॉल; पुढील 48 तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार)

शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. जास्त उत्पन्नासाठी नवनवीन जातीची लागवड होत आहे. त्याचा फायदा जागतिक बाजारपेठेतील शेतकऱ्यांना मिळत आहे. कोरोनामुळे अनेक शेतकरी गावाकडे शेती व्यवसाय करत आहेत. त्यामुळे एचटीबीटी बियाण्यात रोजगार देण्याची तसेच उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता आहे, असंही शेतकरी संघटनेने म्हटलं आहे.

वर्धा जिल्ह्यात आज खातखेडा गावात एचटीबीटी बियांण्याची लागवड करण्यात आली. राज्यात विविध जिल्ह्यात ‘एचटीबीटी‘ कापूस बियाण्याची अनधिकृतपणे साठवणूक करून त्याची शेतकऱ्यांना विक्री केली जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटकदेखील करण्यात आली आहे. परंतु, शेतकरी संघटनेकडून या बियाणांच्या लागवडीसाठी ‘मी पण गुन्हेगार’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.