महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या 1135 झाली आहे. सध्या राज्यात 942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्य सरकार या संकटाशी सामना करण्यासाठी अनेक उपायोजना राबवत आहे. अशात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने, राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (NSCI) डोमला विलगीकरण केंद्रामध्ये (Quarantine Centre) रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमला क्वारंटाइन झोनमध्ये बदलण्याची तयारी सुरू देखील झाली आहे. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट -
The NSCI Dome being transformed into a huge quarantine centre as we step up our contact tracing and testing in @mybmcWardGS . Till now, our contact tracing has been highest and testing too. Ensuring that carriers are isolated for their own safety and for that of others pic.twitter.com/tjv5e3eKqV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 8, 2020
या स्टेडियमवर प्रो कबड्डी लीग आणि एनबीए इंडिया खेळांसह असंख्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. सुमारे 400-500 रूग्णांना सामावून घेता येईल इतकी या केंद्राची क्षमता आहे. एनएससीआयचे सचिव अतुल मारू यांनी बुधवारी स्पोर्टस्टारला सांगितले की, ‘कोरोना विषाणूशी संबंधित रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी अधिकारी एका योग्य जागेच्या शोधात होते. त्यांनी ही जागा पहिली व त्यांना ती योग्य वाटली. आम्हीदेखील ही जागा त्यांना उपलब्ध करून देऊन या कार्यात सरकारला आमचा पाठींबा देत आहोत.’
दक्षिण मुंबई परिसरातील G वॉर्ड येथील संशयित रुग्णांना या ठिकाणी ठेवले जाईल. या ठिकाणी सुमारे 400-500 लोकांना वेगळे ठेवण्याची सोय आहे. बीएमसीने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी आधीच सुरु केली आहे. साधारण गुरुवारपासून या जागेचा वापर करणे सुरु होईल. याबबत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी संपूर्ण राज्य यंत्रणा कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही’. (हेही वाचा: महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही; राजेश टोपे)
मुंबईत अशाप्रकारे विलगीकरण केंद्रामध्ये रुपांतरीत झालेले एनएससीआय हे पहिले स्पोर्ट्स केंद आहे. यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमला, आवश्यकतेनुसार रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी उपलब्ध करुन देता येईल असे सांगितले होते.