कोरोना व्हायरसच्या Coronavirus) पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (Aurangabad Municipal Elections 2020) पुढे ढकलावी. तसेच जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (MIM Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. त्यामुळे देशातील अनेक नेत्यांनी आपले दौरेदेखील रद्द केले आहेत. केंद्र सरकारने राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांना परदेश दौरा रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जलील यांनीही मनपा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द!)
अद्याप औरंगाबाद निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जलील यांनी ही मागणी केली आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत पालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, असंही जलील यांनी म्हटलं आहे. (हेहा वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी)
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून वॉर्ड रचना करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या 15 ते 20 मार्चच्या दरम्यान महापालिका आयुक्त महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर लगेचचं आचारसंहिता लागू होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 45 दिवसांऐवजी 30 दिवसांचीचं आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी 15 ते 20 एप्रिल दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडेल, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.