Mumbai Rain: मुंबई, ठाणे आणि पालघर शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Monsoon Forecast (Photo Credits: PTI)

देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आणि लगतच्या भागात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सवाच्या आगमनानंतर मान्सूनदेखील सक्रिय झाला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि जवळपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. शिवाय, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार असल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला आहे. याचदरम्यान, येत्या काही दिवसात शहरात मुसळधार पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या अद्ययावत माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पालघर शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Monsoon Forecast 2019: पुढील 48 तासांत विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईतही पावसाची कोसळधार सुरुच राहणार)

आयएमडीने बुधवारपर्यंत मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जागरुक राहण्यास सांगितले आहे. मात्र, गुरुवारीपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील किनारपट्टीभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हपूर, सातारा, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जरी करणे म्हणजे 'तयार असणे' कारण हवामान परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. विभागाच्या मते, 'मुसळधार पाऊस' झाल्यास 64.5 मिमी ते 115.5 मिमी आणि 'अति मुसळधार पाऊस' मध्ये 115.6 मिमी ते 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततच्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल सेवांवर झाला आहे.