Maharashtra Monsoon Forecast 2019: पुढील 48 तासांत विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईतही पावसाची कोसळधार सुरुच राहणार
Maharashtra Monsoon Forecast (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon 2019: गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतील अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात पावसाची कोसळधार सुरु असून येत्या 48 तासांत विदर्भासह कोकण (Konkan), गोवा (Goa) आणि मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने जरी थंडावा दिला असला तरीही गणेश भक्तांच्या उत्साहावर या पावसाने विरजण पाडले आहे.

विदर्भातील (Vidarbha) जळगाव, अकोला, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण, गोवा आणि मुंबईतही येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हेही वाचा- Mumbai Monsoon Update: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची लोकल 15 मिनिटे उशिराने

गेल्या 24 तासांत कोकण गोवा येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु असून मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत हर्णेमध्ये 91मिमी, डहाणूमध्ये 51 मिमी, वेंगुर्ल्यामध्ये 48 मिमी, ब्रह्मपुरीमध्ये 45 मिमी आणि रत्नागिरीमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सततच्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकल सेवांवर झाला असून पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने, तर मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहे.