Urmila Matondkar: मी 'पिपल मेड' स्टार आहे, मला 'पिपल मेड लीडर' व्हायचे आहे; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया
Urmila Matondkar (Photo Credit: Twitter)

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आज अखेर शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी हाती शिवबंधन बांधल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेत जाण्याबद्दलची भूमिका मांडली आहे. "मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली, तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी आहे. मी 'पिपल मेड' स्टार आहे, मला 'पिपल मेड लीडर' व्हायला आवडेल," असे त्या म्हणाल्या आहेत.

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवले होते. उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र, आज उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. वर्षभरात या महाविकास आघाडीने खूप चांगले काम केले आहे. कोरोनाचे संकट असो, वादळ असो किंवा इतर आपत्ती असो मी या सरकारला कायमच चांगले काम करताना पाहिले आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना या सरकारने विशेष वागणूक दिली नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Pritam Munde On Urmila Matondkar: ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

तसेच, "मी कधीच कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. मला लोकांसाठी काम करायचे आहे, म्हणून मी शिवसेनेत आले आहे. मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली, तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी आहे. मी 'पिपल मेड' स्टार आहे, मला 'पिपल मेड लीडर' व्हायला आवडेल," असेही त्या म्हणाल्या आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. पण आता शिवसेनेसोबत त्यांनी नव्याने राजकीय वाटचाल सुरु केली आहे.