अभिमानास्पद! IIT Mumbai भारतात प्रथम, तर जागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये 177 वा क्रमांकावर
IIT Mumbai (Photo Credits: Twitter)

वर्ष 2022 च्या क्वाकारेली सायमंड्स (QS) जागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये आयआयटी मुंबईने भारतात प्रथम, तर QS जागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये 177 वा क्रमांक पटकावला आहे. मुंबईकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारतातील आयआयटी-मुंबई, आयआयटी-दिल्ली आणि आयआयएससी-बंगळुरू या तीन विद्यापीठांनी या मानांकनामध्ये पहिल्या दोनशे विद्यापीठांत स्थान मिळवले आहे. ब्रिटिश कंपनी असणाऱ्या QS ने मंगळवारी 8 जून 2021 रोजी हे निकाल जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या तीनही संस्थांचे अभिनंदन केले आहे.

देशातील अधिकाधिक शिक्षणसंस्थांची गुणवत्ता वाढवून तरुणाईच्या बुद्धिमत्तेला पाठबळ देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर हे निकाल म्हणजे भारताची जगद्गुरू होण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे द्योतक असल्याची भावना शिक्षणमंत्री निशंक यांनी व्यक्त केली आहे.हेदेखील वाचा- IIT Mumbai: ऑक्सिजन टंचाई टाळण्यासाठी आयआयटी मुंबईचा अभिनव उपाय

आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)- मुंबईने 100 पैकी एकूण 46.4 गुण मिळविले. शैक्षणिक लौकिकाबाबत या संस्थेने 51.3 गुण मिळविले असून, नियोक्त्यांमधील लौकिकात 79.6 गुणांची कमाई केली आहे. अध्यापकांच्या गुणवत्तेबाबत 55.5, अध्यापक-विद्यार्थी गुणोत्तराच्या बाबतीत 32.5, आंतरराष्ट्रीय अध्यापकांच्या बाबतीत 1.5 तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबाबत 1.6 गुण आयआयटी-मुंबईने मिळविले आहेत. या सहाही मापदंडांसाठी जास्तीत जास्त शंभर गुण धरण्यात आले होते. आयआयटी-मुंबईने सर्वाधिक गुण 'नियोक्त्यांमध्ये मानाचे स्थान' या मापदंडाअन्तर्गत कमावले आहेत. त्या बाबतीत या संस्थेचा जगात 72 वा क्रमांक लागतो.

या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा.सुभासिस चौधरी म्हणाले, "तीन प्रमुख मापदंडांच्या (शैक्षणिक लौकिक, नियोक्त्यांमध्ये लौकिक, अध्यापकांची वैयक्तिक गुणवत्ता) बाबतीत संस्थेने गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी केल्याचे समाधान वाटते. गेल्या काही वर्षांपेक्षा खूप जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने अध्यापक-विद्यार्थी गुणोत्तराविषयीचे आमचे गुण कमी झाले, तसेच एकूण मानांकनात काहीशी घसरण झाली. सर्व आघाड्यांवर संस्थेची चांगली प्रगती सुरु असल्याने येत्या काही वर्षांत कामगिरी आणखी सुधारून खूप चांगला क्रमांक पटकावण्याचा आत्मविश्वास वाटतो." QS जागतिक विद्यापीठ मानांकनांच्या वर्ष 2022 च्या क्रमवारीत सर्वोच्च 14% शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी-मुंबईची गणना झाली आहे.