महाराष्ट्र पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. आपल्या मंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर, लगेचच त्यांनी पोलिसांना चांगल्याप्रकारचे घरे उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यातील पोलिसांसाठी मुंबई, पुणे, पनवेल या सारख्या विविध भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पुण्यातील एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान बोलताना ते म्हणाले, “पोलीस अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात राहात आहेत. मुळात पोलिसच आपल्या राज्यातील कायदा, सुव्यवस्था बघतात आणि आपल्यासाठी 24 तास राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे.”
इतकंच नव्हे तर त्यांना मेट्रो प्रकल्पाबद्दल पण एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “मेट्रो प्रकल्पासाठी पैसे दिले गेलेले नाहीत. गेल्या सरकारने ते काम केले नाही. सर्व खात्यांना निधी द्यायचा आहे. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा? ते मी सध्या बघत आहे."
विविध कामांसाठी निधी देताना ते अनेक गोष्टींचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहित धरुन बाकीच्या कामांना कितपत निधी द्यायचा? याबाबत माझे कामकाज सुरु आहे. सध्या मी सर्व विभागांचा आढावा घेत आहे. याविषयावर चर्चा करत आहे आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे”, असे अजित पवार म्हणाले.