पुणे: पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पतीने घेतला गळफास, उत्तमनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
Husband Commits Suicide| Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

पुणे (Pune) शहरातील उत्तमनगर पोलीस स्थानकात पोलिसांनी एक महिला आणि तिच्या माहेरकडील कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याच्या मृत्यूस जबाबदार व त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ही महिला आणि इतरांवर आरोप आहे. मृत पतिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. अरुण सुरेश वाबळे (वय 34, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रोड) असे मृत पतीचे नाव आहे. तर, पत्नीचे नाव अर्चना वाबळे असे आहे. अरुण वाबळे यांनी आपल्या राहत्या घरी रात्रीच्या गळफास घेऊन आत्महत्या (Husband Commits Suicide) केली होती.

या घटनेबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, आरोपी महिला आणि सुरेश वाबळे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांमध्ये घरगुती कारणावरुन वाद होते. या वादाचे रुपांतर अनेकदा मोठ्या भांडणात होत असे. दरम्यान, मृत अरुण सुरेश वाबळे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी आणि तिच्या माहेरच्यांकडून सुरेश अरुण यांना मानसिक त्रास दिला जात असे. अनेकदा अरुण यांना शिवीगाळ करुन मारहाणही करण्यात आली होती. तसेच, यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही पत्नी आणि तिचे कुटुंबिय अरुण यांना देत असल्याचे त्यांच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पत्नी अर्चना आणि अरुण वाबळे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या विवाहाला अवघी दोन वर्षे पूर्ण झाली होती. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. चरितार्थ चालविण्यासाठी दोघेही कामधंदा करायचे. पती अरुण हा रंगकाम करत असे. तर, पत्नी अर्चना ही खासगी शिकवणी घेत असे. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन सातत्याने वाद होत असत. (हेही वाचा, नालासोपारा: पतीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे भासवणाऱ्या महिलेला अटक!)

दरम्यान, पती अरुण वाबळे यांनी आत्महत्या केली त्या दिवशीही (शनिवार) त्यांच्यात काही कारणावरुन अशीच वादावादी झाली होती. या वादातून आणि पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या अरुण यांनी राहत्या घरी रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची दखल घेत पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र, अरुण यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी अर्चना, तिचा भाऊ व बहिण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपास सुरु आहे.