कोविड-19 च्या वाढत्या संकटातही HSC, SSC च्या गुणपत्रिकांचे शाळा-कॉलेज मधून वाटप; MSBSHSE लवकरच जारी करणार गाईडलाईन्स
HSC, SSC Mark Sheets Distribution | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यात 16 जुलै रोजी 12 वीचा निकाल जाहीर झाला असून आता 10 वीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकांचे वितरण कसे होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतील. दरम्यान लवकरच गुणपत्रिकांसंबंधित नियमावली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) जाहीर करण्यात येईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 10 वी, 12 वीच्या मार्कशिट संदर्भातील सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून विभागीय कार्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतील. (दहावीचा निकाल तारीख आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर पाहू शकाल मार्क्स!)

दरम्यान कोरोना व्हायरसचे संकट दाट असले तरी 10 वी आणि 12 वीचे निकाल विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयात जावून घ्यावे लागणार आहेत. गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात सोपवण्यात येतील. मात्र कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग आणि इतर खबरदारी यांचा विचार करुनच गाईडलाईन्स जारी केल्या जातील. त्यामुळे गुणपत्रिका वाटपादरम्यान त्यांचे पालन करणे अनिवार्य असेल.

10 वी, 12 वी ची गुणपत्रिका विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याने ती विद्यार्थ्यांना वैयक्तिरित्या देण्यात येईल, असे राज्य बोर्डाच्या सेक्रेटरींनी सांगितले. दरम्यान देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 254427 वर पोहचली असून 10289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 103516 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 140325 कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या शहरांभोवती कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट आहे.