प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

वाहन चालवताना सुरक्षा ही देखील महत्त्वाची आहे. त्यासाठी जनाजागृती निर्माण करण्यासोबतच आता काही सक्तीचे नियम करून ही सुरक्षा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) मध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती (Helmet Mandatory) करण्यात आली आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार आता कारवाईला नाशिककरांना सामोरं जावं लागणार आहे. सोबतच पाचशे रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे दुचाकीवर प्रवास करणार असाल तर घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट ठेवायला विसरू नकाच.

नाशिकमधील हेल्मेट सक्तीची ही पहिलीच वेळ नव्हे. ही मोहीम तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर थंडावली होती. पण आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून आजपासून हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकी चालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्यावर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे.

नाशिक मध्ये स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. नक्की वाचा: Helmet न घातल्याने Traffic Police Constable ने दोन जणांना चालत्या स्कूटीवरून जमिनीवर ढकलले, व्हिडीओ व्हायरल .

नाशिक मध्ये यापूर्वी 'हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही' असाही प्रयोग राबवण्यात आला होता. मात्र तो काही अंशी वादात सापडला. त्यानंतर नाशिक शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात 'हेल्मेट नाही तर सहकार्य नाही' हा प्रयोग नंतर राबवण्यात आला. मात्र पांडे यांच्या बदलीनंतर हे अभियान देखील बाजूला पडले.

दुचाकीच्या अपघातानंतर जीवितहानी, अपंगत्व यासारखे प्रकार कमी करण्यासाठी हेल्मेटसक्ती केली जात आहे. मुंबई मध्ये आता चालक आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्ती बंधनकारक केली आहे.