Maharashtra Rain Update : कोकणात पावसाचा जोर कायम, रत्नागिरी जिल्ह्यात जारी केला Red Alert, 'या' जिल्ह्यांनाही बसणार पावसाचा तडाखा
Rainfall | (Image used for representational purpose only) | (Photo Credits: pixabay)

राज्यात पावसाने कालपासून जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाची(Rain in Maharashtra) संतंतधार सुरू आहे. कोकणात मात्र पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे कोकणातील (konkan) अनेक नद्यांना पूर आले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याला (Ratnagiri) पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. कोकणाप्रमाणेच इतर जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर. रायगड आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, औरंगाबाद, ठाणे, पालघर, जालना जिल्ह्यांत प्रशासनाने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

मागील आठवड्यापासून कोकणाला मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. यामुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली तर परिस्थिती हाताळण्यासाठी तेथील प्रशासनही आता सज्ज झाले आहे.

कोकणाप्रमाणे राज्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई, पालघर औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने अनेक धरणांचे दरवाजे काही मीटरने उघडण्यात आले आहेत. यात परभणी जिल्ह्यातील निन्म दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पावसामुळे यात एकूण 84 टक्के पाणीसाठी निर्माण झाला आहे. तसेच पाणीपातळीत वाढ झाल्याने सेलू तालुक्यातील या धरणाचे एकूण 14 दरवाजे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहेत. परभणीत पावसाचा वेग जास्त असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. येथील नद्यांनाही पूर आले असल्याने नदीवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. परभरणीत पडणाऱ्या पावसामुळे जवळपास 20 गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पेरणीचे दिवस असल्याने बळीराजाला पावसाची गरज लागतेच. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी बियाणे खरेदी करून पेरणी करण्यात व्यस्त झाला आहे. यावरूनच पावसाचा कृषी अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतीच्या कामांनाही वेग येईल.