Maharashtra Unlock: राज्यातील शाळा-महाविद्यालयं, मंदिरं कधी खुली होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) शैक्षणिक वर्षांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयं नेमकी कधी सुरु करणार, या प्रतिक्षेत विद्यार्थी-पालक आहेत. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगित देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शाळांबाबतचा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. महाविद्यालयंही लवकरच सुरु करण्यात येतील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी शाळा-महाविद्यालयं कधी सुरु होणार, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल, टोपे यांनी सांगितले. यासाठी उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. त्यानंतर येत्या 5-6 दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल. तर शाळांसंदर्भातील निर्णय शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सशी चर्चा करुन घेण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. (Covid-19 Vaccination in Maharashtra: लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी दरमहा 2 कोटी डोसेस मिळणे गरजेचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

दरम्यान, मंदिरांबाबत बोलताना टोपे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंदिरं उघडण्याची घाई नको, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याने त्यासंदर्भात तेच निर्णय घेतील. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरी चिंता करण्याची गरज नाही. त्या भागात लसीकरण वाढवण्याचा आमचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लस घेतली तरी संसर्ग होऊ शकतो. मात्र लसीमुळे परिणामकारकता कमी होईल. आयसीयू, ऑक्सिजनची गरज भासणार नाही. लसीकरण झालेल्या देशांमध्ये मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र लसीकरण झाले तरी नियम पाळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. लस नाकातून घ्यायची की दंडातून याबाबत आयसीएमआर मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येईल.

राज्यातील लसीकरण यंत्रणा सक्षम असून आपण मोठ्या प्रमाणवर लसीकरण करु शकतो. केवळ लस उपलब्ध नसेल तेव्हात लसीकरणाला ब्रेक लागतो. अशावेळी केंद्राकडून लस उपलब्ध झालेली नसते, असे टोपे यांनी स्पष्ट केलं.