Uday Samant | (File Photo)

कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयं मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे कॉलेजेस नेमकी कधी सुरु होणार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु होणार, याची प्रतिक्षा, विद्यार्थी पालक करत आहेत. दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher And Technical Education Minister Uday Samant) यांनी राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (राज्यात महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती)

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, ”महाविद्यालयं सुरु करण्यासाठी आमची देखील तयारी झालेली आहे. मात्र ती कशा पद्धतीने सुरु करायची? किती टक्क्यांच्या आधारे सुरु करायची? या संदर्भात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. परंतु, शाळा, महाविद्यालयं सुरु करणं तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अडचणीचं होऊ शकतं, असं टाक्स फोर्सने सांगितलं आहे. त्यामुळे हे सर्व अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करण्यात येतील. तसंच टाक्स फोर्सशी चर्चा करु. परंतु, महाविद्यालयं सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची तयारी झालेली असून कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

या पत्रकार परिषदेत त्यांनी रानडे इन्स्टिट्यूट संदर्भात झालेले महत्त्वपूर्ण निर्णय सांगितले. रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आज विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर  विद्यापीठाकडून हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.