![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/images_1541415063447_mhada1.jpg?width=380&height=214)
राज्यात नुकतीच म्हाडाच्या (MHADA) कोकण विभागातील 2,147 घरे आणि 117 भूखंडांची सोडत काढण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) पुढील पाच वर्षांत राज्यात आठ लाख घरे बांधेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, 493 परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळाच्या कार्यालयात आयोजित गो-लाइव्ह कार्यक्रमात नाशिक मंडळाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नोंदणीचे औपचारिक उद्घाटन केले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि निम्न उत्पन्न गट (LIG) यांना सेवा देणारी ही घरे नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार आणि इतर अनेक ठिकाणी आहेत. एकूण 291 घरे सर्वसाधारण लॉटरीद्वारे उपलब्ध आहेत, तर 202 घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वाटली जातील.
ठाकरे यांनी पात्रता निकष आणि अर्ज मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणारी अधिकृत पुस्तिका प्रकाशित केली आणि अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी ती पाहण्याचे आवाहन केले. त्यांनी फसव्या एजंटांविरुद्ध इशारा दिला, व म्हाडाने घर वाटपासाठी कोणत्याही प्रतिनिधींना अधिकृत केलेले नसल्याचे सांगितले. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र घोषित; सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची मंत्री Aditi Tatkare यांची माहिती)
या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता सुरू झाली आणि 6 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहील. पुढे 7 मार्च रोजी रात्री 11.51 वाजेपर्यंत ऑनलाइन व्यवहारांद्वारे पेमेंट करता येईल, तर आरटीजीएस/एनईएफटी व्यवहार त्याच दिवशी बँकिंग वेळेत पूर्ण करावे लागतील. मंजूर अर्जदारांची अंतिम यादी 13 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. अर्जदार सामान्य योजनेसाठी housing.mhada.gov.in वर नोंदणी करू शकतात, तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असलेले अर्ज lottery.mhada.gov.in वर सादर करता येतील.